मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेनेचे नेते तथा खा.संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी न्यायालयीन कोठडीतअजूनही दिलासा मिळालेला नाही. राऊतांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये ४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ईडीकडून आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे.
संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी ४ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ईडीकडून आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे. मात्र जोवर आरोपपत्राची कॉपी मिळत नाही, तोवर या खटल्याची सुनावणी दैनंदिनरित्या चालणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. ईडी कायम आरोपींना आरोपपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याचं निदर्शनास आल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
एकीकडे शिवसेना आपल्या अस्तित्वासाठीची कायदेशीर लढाई लढत आहे. पक्षातल्या ऐतिहासिक बंडानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आमदारांचा मोठा गट पक्षातून बाहेर पडला. त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यात बंडखोर गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केल्याने पक्ष आणखी कोंडीत सापडला आहे. उद्धव ठाकरेंनी या धक्क्यांनंतर सावध पवित्रा घेत उर्वरित पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असून पक्षबांधणीसाठी आदित्य ठाकरेंना मैदानात उतरवलं आहे.
त्यात आता दसरा मेळाव्याचा मुद्दाही चांगलाच पेटला आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासूनची पक्षाची परंपरा असलेला शिवाजी पार्क मैदानावर भरवण्यात येणारा शिवसेनेचा दसरा मेळावा कोण घेणार यावरुन वादंग निर्माण झाला आहे. शिंदे गट आणि सेनेत याप्रकरणी चढाओढ सुरू आहे. अद्याप शिवाजी पार्क कोणाला मिळणार याबद्दल महापालिकेने निर्णय दिलेला नाही. त्यामुळे आता शिवसेनेने कोर्टात जाण्याची तयारी दाखवली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या संकटकाळात उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जाणाऱ्या संजय राऊतांच्या कोठडीत असण्याने पक्षाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.