पुणे : वृत्तसंस्था
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्र लिहलं आहे. त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पत्राद्वारे अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विशेष विनंती केली आहे. ज्येष्ठ नेते विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर, अजितदादांनी पावसाळी अधिवेशनात राज्यातील रस्त्यांच्या बाबतीत विषय मांडला होता. यापैकी, मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील विविध समस्यांबाबत त्यांनी एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहीले आहे.
पावसाळा सुरु झाल्यापासून राज्यातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून यामुळे मुंबई-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर दररोज असा वाहतूक कोंडी होत आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून या अपघातामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्यांवरील खड्यांमुळे मणक्यांचे आजारांचे प्रमाण वाढले आहेत. वाहतुक कोंडीमुळे शहरातून प्रदूषणात भर पडत आहे. मुंबई नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणारे नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत, असे अजित पवार यांनी नमूद केले आहे.
या परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करणे, पुलांचे अपूर्ण काम युद्धपातळीवर पूर्ण करणे, अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीवर मार्ग काढणे यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी, वाहतूकदार संघटना, प्रवासी संघटना, स्थानिक नागरिक आदींना विश्वासात घेऊन वाहतुकीचे सुयोग्य आणि प्रभावी नियोजन करावे. अनुषंगित उपाययोजना तात्काळ करणेबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात. शहरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करुन या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा देण्याचे काम करावे, अशी विशेष विनंती अजित पवार यांनी केली आहे.