पुणे : वृत्तसंस्था
पुण्यातील सासवड रस्ता, ऊरळी देवाची, हॉटेल सोनाई जवळ शिवशाही बस व कंटेनरचा रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषणअपघात झाला. या अपघातात बस आणि कंटेनर यांचा पुढील भागाचा चक्काचूर झाला असून एक प्रवासी ठार झाला असून सहा प्रवासी जखमी झाले आहेत.
अग्निशमन अधिकारी अनिल गायकवाड यांनी माहिती दिली आहे की, या अपघातात काही जण जखमी असून गाडीमधे अडकले असल्याची माहिती अग्निशमन दलाकडे मिळाली असता तातडीने काळेबोराटे नगर अग्निशमन केंद्रातील वाहने घटनास्थळी पाठवण्यात आले. घटनास्थळी पोहोचताच याबाबतची माहिती अग्निशामक नियंत्रण कक्षास ही देण्यात आली. या घटनेत शिवशाही बस (MH,14 GO 3104), (पंढरपुर-स्वारगेट) व कंटेनर (MH18 AA 7190) यांचा मोठा अपघात झाला.
अग्निशामक दलाची मदत पोहोचण्यापूर्वी शिवशाही बसमधील पाच जखमींना नागरिकांनी बाहेर काढून जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवले होते. तर कंटेनर ड्रायव्हर यालादेखील रुग्णालयात रवाना करण्यात आले. या अपघातात एक प्रवासी ठार झाला असून त्याचे नाव मात्र, अद्याप कळु शकले नाही.
अग्निशामक दलाच्या जवानांनी पाहणी केली असता शिवशाही बसमधे ड्रायव्हर सीटमागे एक जखमी व्यक्ती अडकला होता. तात्काळ अग्निशमन उपकरण फायर एक्स वापरत पाचच मिनिटात सीटवर अडकलेल्या व्यक्तीची सुटका करून त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविले. घटनास्थळी क्रेनची मदत आली असल्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. या अपघातात एकूण सहाजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काळेबोराटे नगर, कोंढवा बुद्रुक व अग्निशमन मुख्यालय येथील रेस्क्यु व्हॅन अशी 3 अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.याबाबत पुढील तपास पोलिस करीत आहेत.