जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील खेडी बुद्रुक येथे तमाशाच्या फडात नाचणारा सहायक फौजदाराला पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निलंबित केले आहे. भटू वीरभान नेरकर असे कर्मचाऱ्याचे नाव असून याच प्रकरणात जळगाव तालुका पोलीस ठाण्याचा आणखी एक कर्मचाऱ्याची चौकशी सुरु आहे.
गेल्या महिन्यात निवृत्ती नगरात भावेश उत्तम पाटील (रा. आव्हाणे, ता. जळगाव) या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणात भूषण रघुनाथ सपकाळे (३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) व मनीष नरेंद्र पाटील (२२, रा.आव्हाणे, ता. जळगाव) या दोघांना अटक झाली आहे. दरम्यान, या घटनेच्या काही दिवस आधी भूषण सपकाळे याने गावात तमाशाचे आयोजन केले होते. तेथे भटू नेरकरसह एका अन्य कर्मचाऱ्याने हजेरी लावली होती. ते दोघे तमाशाच्या फडात नाचल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे नेरकरला निलंबित करण्यात आले तर दुसऱ्याचा या प्रकरणात नेमका काय सहभाग आहे?, त्याची चौकशी सुरु असून तथ्य आढळल्यास त्याच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.