एरंडोल प्रतिनिधी । वडीलोपार्जीत घराच्या जागेवरून मोठ्या भावाने लहान भावाचा मुसळी मारून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील भातखंडेच्या जवळ गिरणा नदीपात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. हा व्यक्ती तालुक्यातील उत्राण (गु.ह.) येथील सत्यवान धोंडू महाजन यांचा असल्याची ओळख पटली. त्यांचा मृत्यू गिरणेच्या पाण्यात वाहून गेल्याने झाला नव्हता, तर त्याचा खून झाल्याची धक्कादायक माहिती तपासात निष्पन्न झाली. या प्रकरणी सत्यवान महाजन यांना त्यांचाच मोठा भाऊ भगवान धोंडू महाजन याने संपविल्याची माहिती मिळाली. यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आ या संदर्भात पोलिसांनी केलेल्या चौकशीत भगवान महाजन याने घटनाक्रम सांगितला. यानुसार भगवान महाजन (वय-६२) आणि सत्यवान महाजन ( वय-५५) हे दोन्ही भाऊ एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील रहिवासी होत. दोन्ही एकाच घरात राहत असून त्यांच्यात अनेकदा कुरबुरी होत असत. दिनांक १२ सप्टेंबर रोजी सत्यवान महाजन यांनी घरातील मोरीत लघुशंका केल्यावरून वाद झाला. यातून संतापलेल्या भगवान याने डोक्यात मुसळी हाणल्याने सत्यवान महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. भगवानने मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवला. यानंतर रात्री उशीरा त्याने पोत्यातून मृतदेह नेउन तो गिरणा नदीच्या पात्रात फेकून दिला. दरम्यान, मृतदेह गिरणा नदीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. खून करणारा मोठा भाऊ भगवान हा घरातून गायब झाला होता. त्यामुळे पोलीसाना शंका अधिक बळावली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली व गुन्ह्याची कबुली दिली. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.