जळगाव : प्रतिनिधी
राज्य व केंद्र सरकारच्या अतिशय महत्वाकांक्षी अशा जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत आज जिल्ह्यातील ५५ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून यासाठी तब्बल ५७ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या या योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आधीप्रमाणेच मंत्रीपदाच्या आपल्या दुसर्या टप्प्यात या योजनेला प्रचंड गती दिली आहे. या योजनेचा पहिला टप्पा जिल्ह्यात अतिशय यशस्वीपणे पार पडला असून दुसरा टप्पादेखील याच तडफेने १००% यशस्वी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, गेल्या पंधरवाड्यात ८९ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देऊन यासाठी ५८ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण ९५६ योजनांच्या कामांना तांत्रिक मान्यता दिली असून त्यापैकी तब्बल ८५२ योजनाना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. यांपैकी ७५९ कामांचे टेंडर काढण्यात आले असून ३४४ गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली असल्याने जिल्ह्यातील कामांना प्रचंड वेग आल्याचे दिसून येत आहे.
जलजीवन मिशन ही योजना राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमधून राबविण्यात येत आहे. याच्या अंतर्गत देशातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे शुध्द पाणी पुरवठा करण्याचा संकल्प घेण्यात आला आहे. यात आधीचे निकष बदलून दरडोई ५५ लीटर या निकषाने पाणी पुरवठा करण्यात येत असून यामध्ये गुरांसाठी लागणार्या पाण्याचाही समावेश करण्यात आलेला आहे. ना. गुलाबराव पाटील हे आधीच्या सरकारमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री असतांना त्यांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांना प्रचंड गती दिली होती. आता एकनाथ शिंदे सरकारमध्ये देखील तेच खाते मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रचंड गतीने जिल्ह्यातील योजनांना मान्यता देण्यास प्रारंभ केला आहे.
अलीकडेच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणार्या जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प. सीईओ डॉ. पंकज आशिया, पाणी पुरवठा अभियंता जी. एस. भोगवाडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या महत्वपूर्ण बैठकीत जिल्ह्यातील ५५ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यासाठी ५७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर मागील पंधरवाड्यात ८९ गावांच्या योजनांना मान्यता दिलेली असून यासाठी ५८ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. या संदर्भात ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जलजीवन मिशनला यशस्वीपणे कार्यान्वित करण्याला आपले प्राधान्य आहे. ही योजना राज्यभरात गतीने सुरू असून जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या घरात शुध्द पाणी पुरवठा करण्याला आपले प्राधान्य राहणार आहे. आधीप्रमाणेच अतिशय वेगाने विविध गावांमधील पाणी पुरवठा योजनांना गती देण्याचे काम करण्यात येत आहे. यासाठी सर्व यंत्रणांना निर्देश दिले असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.
या गावातील योजनांना मिळाली मंजुरी !
यात अमळनेर तालुक्यातील एकरुखी; चाळीसगाव तालुक्यातील अलवाडी, कृष्णापुरी व लोंढे, जावळे, पिंपळवाड निकुंभ, वरखेडे खु. चोपडा तालुक्यातील गलंगी, वढोदे, धनवाडी , घुमावल खु., अन्वरदे खु. व घोडगाव ; जळगाव तालुक्यातील पळसोद, धानोरे खु., ममुराबाद, मोहाडी व विटनेर ; जामनेर तालुक्यातील लोणी, पिंपळगाव कमानी, दोंदवाडे ,रामपुरा, चिलगाव, या गावांचा समावेश आहे. यासोबत धरणगाव तालुक्यातील बोरखेडा, बोरगाव खु., वाकटूकी व धानोरे ; पाचोरा तालुक्यातील कोकडी तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी, चारठाणा, पिंप्राळा, पातोंडी, पिंप्रीनादु, मानेगाव, लोहारखेडा, मनारावेल, बोदवड, रिगाव, धाबे, मेहूण, धापुरी , चिंचोल, आणि काकोडा तर रावेर तालुक्यातील रणगाव, दसनूर, अजंदे भुसावळ तालुक्यातील भिलमळी, मांडवेदिगर, निभोरा खु. हतनूर बोदवड तालुक्यातील जलचक्र खुर्द व जलचक्र बुद्रुक भडगाव तालुक्यातील भोरटेक व उमरखेडा, वलवाडी बुदुक व खुर्द , गिरड तर यावल तालुक्यातील हंबर्डी या ५५ गावांच्या योजनांना मंजुरी मिळाली आहे.