जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहराच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज आक्रमक पवित्रा घेत, बकालेंना ताबडतोब बडतर्फ करण्याची मागणीच अजित पवारांनी केली.
वक्तव्य खपवून घेणार नाही
अजित पवार म्हणाले, राज्यातील कोणत्याही समाजाबद्दल कुणीही काहीही आक्षेपार्ह बोलण्याची आवश्यकताच नाही. बकालेने मराठा समाजाबद्दल जे वक्तव्य केले आहे, ते खपवून घेणार नाही. त्याच्या 10 पिढ्याला आठवण झाली पाहीजे, असं काहीतरी केलं पाहिजे. बकालेला ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे. बकाले पोलिस अधिकारी असला म्हणून काय झालं. त्याला काय शिंग आलीयेत का? की मस्ती आलीये? हा शिवाजी महाराज तसेच शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अशी वक्तव्य अजिबात सहन केली जाणार नाही.
CM शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष
अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बकाले प्रकरणावर काय भूमिका घेतात, हे पाहायचेच आहे. शिंदे नेहमी मी आहे ना, मी आहे ना, असे सांगत असतात. आता ते या प्रकरणावर काय करतात, हे पाहतोच. या प्रकरणात बकालेला फक्त बडतर्फ करुन चालणार नाही. तर, संपूर्ण कर्मचाऱ्यांना अशा प्रकराचे वक्तव्य न करण्याबाबत सक्त ताकीद दिली पाहीजे.
बकालेवर कुणाचा वरदहस्त?
अजित पवार म्हणाले, बकालेवर कुणाचा वरदहस्त आहे का, याचाही तपास झाला पाहिजे. बऱ्याचदा अधिकाऱ्यांवर कुणाचा तरी हात असतो. त्यामुळेच ते अशी बेताल वक्तव्य करतात. कारण माझं कुणीच काही वाकड करु शकत नाही, हे त्यांना माहित असतं. पण, अजित पवार म्हणाले, बकालेवर कारवाई करा म्हणून आंदोलन करायची गरजच काय? या अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळतो, सर्व मान-सन्मान दिला जातो. तरीही शिवाजी महाराजांच्या राज्यात ते असे वक्तव्य करणार असेल तर ते का खपवून घ्यावेत. शासनाने वेळीच याची दखल घेऊन कारवाई केली पाहीजे.