कोळंबा येथे जाऊन साडी चोळी देऊन केला गौरव
कोळंबा (ता चोपडा) : बिबट्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तापी नदीत उडी घेतलेल्या कोळंबा येथील लताबाई बाविस्कर यांचा आज जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी साडी चोळी देऊन सत्कार केला.
चार दिवसांपूर्वी शेतात लताबाई दिलीप बाविस्कर या शेंगा तोडत असताना बिबट्या त्यांच्या दिशेने येताना दिसला. त्यावेळी एकीकडे काटेरी झुडपे तर दुसरीकडे तापीमाई असल्याचे त्यांना दिसले. क्षणाचाही विलंब न लावता लताबाई यांनी तापी नदीमध्ये उडी घेतली. दुपारी चार वाजेला घडलेल्या या घटनेनंतर केळी खांबाच्या सहाय्याने त्या दुसऱ्या दिवशी पोहोत पोहत अमळनेर तालुक्यातील नीम गावाच्या पांथ्यापर्यंत पोहोचल्या होत्या. त्या ठिकाणी ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढून विचारपूस केली व त्यांच्या अतुलनीय धाडसाचे कौतुक केले. या घटनेत लताबाई यांनी बिबट्यापासून स्वतःचे संरक्षण करताना महिला शक्तीमधील धाडसाचा अभिनव परिचय दिला. माध्यमांमधून ही बातमी समजल्यानंतर श्री देवकर यांनी या धाडसी महिलेचा गौरव करण्यासाठी तडक कोळंबा गावाला भेट देऊन लताबाई बाविस्कर यांचा साडी चोळी देऊन गौरव केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चोपडा तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, दिलीप धनगर, रघु कोळी, हरी कोळी, सुखदेव कोळी व कोळंबा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.