जळगाव : प्रतिनिधी
शहर परिसरात दुचाकी चोरत असतांना एका तरुणाला शहर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. त्याने चौकशीत आतापर्यंत तब्बल ११ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी चोरून मौजमजा करणारा दुचाकी चोरटा पवन प्रेमचंद पाटील (वय २६ रा. आव्हाणी, ता. धरणगाव) याला कोर्ट चौकातून दुचाकी चोरताना शहर पोलिसांनी सोमवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी रंगेहाथ पकडले होते. पोलिसांच्या चौकशीनंतर त्याने चोरीच्या ११ दुचाकी काढून दिल्या. या प्रकरणी मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी गुन्हे शोध पथकाला दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून गुन्हे शोध पथकातील कर्मचारी दुचाकी चोरट्याच्या मागावर होते. सोमवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास दुचाकी चोरटा पवन हा जळगावातील कोर्ट चौकात दुचाकी चोरण्यासाठी आला असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिस पथकातील उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हेडकाॅन्स्टेबल विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, रतन गिते, तेजस मराठे, योगेश इंधाटे यांनी सापळा रचून कोर्ट चौकातून दुचाकी लांबवणाऱ्या पवन पाटील याला रंगेहाथ अटक केली होती. चोरट्याने नाशिक येथून २, सुरत येथून २ यासह जळगाव शहरातून ७ अशा एकूण चोरीच्या ११ दुचाकी काढून दिल्या.