कन्नड घाटात दरड कोसळली तर तितूर डोंगरीच्या पूरात दोन जण अडकल्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !
लाइव्ह महाराष्ट्र न्यूज :- हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात अतीवृष्टीचा इशारा दिला असून सोमवारी रात्री चाळीसगाव तालुकापरिसरात झालेल्या पावसामुळे तितूर व डोंगरी नद्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात दोन जण अडकल्याचा अंदाज असून चाळीसगाव तहसिलदार अमोल मोरे यांनी जिल्हाधिकार्यांकडे एसडीआरएफ पथकाची मागणी केली.
तसेच मन्याड प्रकल्प पूर्ण भरल्याने गिरणा नदीपात्र तसेच जामदा बंधार्यातून किमान १५००क्यूसेक प्रवाह आहे. त्यामुळे तितूर, डोंगरी व गिरणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे तर कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतुक विस्कळीत झाली असून हि वाहतूक नांदगाव शिवूर बंगला मार्गाने वळविण्यात आली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
जिल्ह्यात सोमवार रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील तितूूर व डोंगरी नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे चाळीसगाव शहरातील नदीकाठच्या परिसरातील नागरी वसाहतीत पाणी शिरले आहे. या पुरात चाळीसगाव शहरातील दोन इसम अडकले असल्याचा अंदाज असून तीन ते चार गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे तेथे संपर्क होउ शकत नसल्याचे चाळीसगाव तहसिलदार अमोल मोरे यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे. पुरात अडकलेल्या व्यक्तींच्या बचावासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत मागविण्यासाठी अवर सचीव नियंत्रण कक्ष मंत्रालय तसेच जिल्हाधिकारी यांना संदेश देण्यात आल्यानुसार धुळे राज्य राखीव पोलीस बल तसेच एसडीआरएफ पथक पाठविण्याचे निर्देशानुसार मदत कार्य केले जात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
कन्नड घाटात रात्रीच्या वेळी मुसळधार पावसामुळे दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तर काही ठिकाणी झाडे देखिल उन्मळून पडली असून सर्वत्र दगडांचा खच व चिखल असल्याने अनेक वाहने रस्त्यात अडकली आहे. त्यामुळे कन्नड घाटात वाहतुक खोळंबली आहे. कन्नड औरंगाबादकडे तसेच चाळीसगाव शहराकडे सुमारे आठ ते दहा कि,मी. अंतरापर्यत वाहने खोळंबली आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दल व स्थानिक वाहतूक पोलीस प्रशासनातर्फे मदत व बचाव कार्य केले जात आहे.