जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांची मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. यामुळे पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. अखेर ही बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.
जळगाव गुन्हे शाखा निरीक्षकांचा जिल्ह्यात सर्वाधिक दबदबा असतो हे सर्वश्रृत आहे. शिवाय या पदावरील खुर्ची मिळण्यासाठी अधिकार्यांमध्ये मोठी चढाओढदेखील असते. मात्र या पदावरील अधिकार्याची पोलिस अधीक्षकांनी तडकाफडकी बदली केल्यानंतर प्रचंड खळबळ पोलिस दलात उडाली आहे.
पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या कार्यकाळात अनेक खुनांसह कठीण गुन्ह्यांचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले होते. शिवाय गुन्हे डिटेक्शनचे प्रमाणही अलिकडच्या काळात वाढल्याचे दिसून आले होते. मात्र असे असताना अचानक निरीक्षकांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने आश्चर्यदेखील व्यक्त केले जात आहे. मंगळवारी रात्री 11.30 वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहे. एका समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी केल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.