जळगाव : प्रतिनिधी
शहरातील नेहरु चौकात मद्यप्राशन करुन रस्त्यावर धिंगाणा घालत राजेंद्र भगवान पाटील (वय ३८, रा. मारोती पेठ, जळगाव) याने पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा प्रकार सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी राजेंद्र पाटील याला अटक करण्यात आली असून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ११ वाजता नेहरु पुतळ्यासमोर राजेंद्र पाटील याने मद्याच्या नशेत धिंगाणा घातला. स्वत:ची दुचाकी रस्त्यावर आडवी लावून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ केली. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर शहर पोलीस ठाण्याचे हवालदार विजय निकुंभ, प्रफुल्ल धांडे, बापू मोरे, अय्युब खान मसूद खान असे घटनास्थळी गेले. पाटील याची समजूत घालत असताना त्याने पोलिसांशीच हुज्जत घालून धांडे यांच्या हाताचे बोटे पिळले व तुमच्या नोकऱ्या घालवतो असे म्हणून दमदाटी केली. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले. विजय निकुंभ यांच्या फिर्यादीवरुन त्याच्याविरुध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.