जळगाव : प्रतिनिधी
सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. जळगाव तालुक्यातील पाथरी शिवारात झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते शेतकर्यांशी बोलत होते. दरम्यान, सध्या गुरांवर लंपी या संसर्गजन्य रोगाचा प्रकोप वाढीस लागला असून याचा प्रतिकार करण्यासाठी लसीकरणाला गती देण्याचे निर्देश आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. तर, याप्रसंगी त्यांनी आमदार निधीतून पाथरी ते जवखेडा रस्ता तयार करून देण्याची ग्वाही दिली.
सध्या गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू असून आज ना. गुलाबराव पाटील यांनी यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यासाठी ना. पाटील हे आज जळगाव तालुक्यातील पाथरी येथे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. मुसळधार पाऊस आणि वादळी वार्यांमुळे पाथरी परिसरात बागायती कापूस व मका पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत तहसीलदार नामदेव पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी हजर होते. ना.गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली आणि प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना भरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
दरम्यान, सध्या गुरांवर लंपीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने शेतकरी आणि पशुपालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना लसीकरणाला वेग देण्याचे निर्देश दिले.
या वेळी ना. गुलाबराव पाटील यांनी पाथरी – दहिगाव रस्ता, पाथरी – डोमगाव रस्ता, जवखेडा – पाथरी शिव रस्ता मंजूर केला असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले. यावेळी म्हसावद ते पाथरी हा रस्ता गावा बाहेरून वळवावा अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली असता त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली.
या वेळी तत्कालीन जि. प. सदस्य पवन सोनवणे , लोकनियुक्त सरपंच शिरीष जाधव सर, सं.गा.यो.चे अध्यक्ष रमेशआप्पा, रोजगार हमी योजना चे अध्यक्ष रवी कापडणे, मा.प.स.सदस्य धोंडू जगताप, वडली माजी सरपंच सचिन पाटील, मा. सरपंच निलेश पाटील, उपसरपंच नाना पाटील, ग्रा. प. सदस्य विक्रमसिंह पाटील, सुभाष लंगरे शिवसेना , युवासेना कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.