म्हसावद : प्रतिनिधी
येथील युवा धावपटू लोकेश पाटील यांचा नागरी सत्कार नुकताच राष्ट्रवादीचे युवा नेते विशाल देवकर यांच्या हस्ते करण्यात आला. लोकेश यांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड स्पर्धा जिंकून म्हसावद नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून, गावाचा झेंडा सातासमुद्रापार लावला असल्याचे गौरवोद्गार यावेळी देवकर यांनी काढले.
म्हसावद येथील लोकेश संजय पाटील यांनी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे कॉम्रेड मॅरेथॉन आयोजित स्पर्धेत 90 किलोमीटर अंतर अवघ्या नऊ तास 55 मिनिटांत पूर्ण केले. हा विक्रम करणारा तो जगातील सर्वात तरुण धावपटू ठरला. तसेच या विक्रमामुळे त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नामांकन मिळाले आहे. त्यामुळे मसावद येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा झाला. येथील थेपडे विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे विशाल देवकर यांनी गावातील युवा धावपटूच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच गावातील ईशा वैद्य या विद्यार्थिनीने नीट परीक्षेत 720 पैकी 610 गुण मिळवल्याबद्दल तिचाही सत्कार विशाल देवकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला थेपडे विद्यालयाचे चेअरमन डॉ. केदार थेपडे, मुख्याध्यापक श्री सोनार, तुकाराम दादा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बापू परदेशी, निलेश पाटील, कैलास पाटील, सतीश सूर्यवंशी, विवेक चव्हाण, सिताराम नाना, सुधाकर सपकाळे, संजय पाटील, ईश्वर पाटील, योगराज चिंचोरे, सचिन चव्हाण, भंगाळे सर, यू पी पाटील, मकरंद वैद्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.