मुंबई : वृत्तसंस्था
केंद्रातले ‘यूपीए’ सरकार मोदी व अमित शहांच्या मागे हात धुऊन लागले असताना मोदी व पवारांतील सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत झाली. असा गौप्यस्फोट शिवसेनेने मुखपत्र सामनातून केला.
शिवसेनेने मुखपत्र सामनातून गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. अमित शहा हे वारंवार शिवसेनेच्या बाबतीत ही अशी भाषा वापरतात. हा त्यांच्या मनातील महाराष्ट्राविषयीचा द्वेष आहे. खरं तर त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांविषयी सदैव कृतज्ञ राहायला हवे. केंद्रातले ‘यूपीए’ सरकार मोदी व अमित शहांच्या मागे हात धुऊन लागले असताना मोदी व पवारांतील सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत झाली. हा गौप्यस्फोट नसून सत्य आहे.
आणखी एका प्रकरणात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सरकार’ पद्धतीने भूमिका करून अमित शहा यांना त्या काळात मदत होईल अशी व्यवस्था केली होती. असा खुलासा शिवसेनेने मुखपत्र सामनातून केला आहे.
तसेच दोन्ही प्रसंगावर स्वतंत्र लिखाण संजय राऊतच करू शकतील. असदेखील सामनात सांगण्यात आलं आहे. या प्रकरणावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलू शकतील; पण त्याच ठाकरे-पवारांविरुद्ध टोकाचे मिशन आज अमित शहा व त्यांचे लोक चालवीत आहेत.
राजकारणात व लोकशाहीत मतभेदांना जागा आहे. निवडणुकीच्या माध्यमांतून पराभव करणे व तसे बोलणे हे चुकीचे नाही, पण भाजपास शिवसेना फुटल्याबद्दल आनंदाचे भरते आले आहे. शिंदे गटास बेकायदेशीरपणे राजसिंहासनावर बसवून त्यांनी ईप्सित साध्य केले. त्यांचे हास्य विकट आहे. उद्धव ठाकरे व शिवसेनेस गाडण्याची भाषा महाराष्ट्रविरोधी आहे.
बाळासाहेब ठाकरेंशी व त्यांच्या विचारांशी बेइमानी आहे. अमित शहा मुंबईत येऊन अशा विषाची पेरणी करतात व भाजपमधील ‘मऱहाठे’ त्यावर टाळय़ा वाजवतात. भाजपमध्ये एखादा चिंतामणराव देशमुख निर्माण होण्याची शक्यता नाही. मात्र अमित शहांनी शिवसेना गाडण्याची व ठाकऱ्यांना धडा शिकविण्याची भाषा सतत करीत राहावे. असे सांगत शिवसेनेने खोचक सल्लादेखील सामनातून देण्यात आला आहे.