जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मेहरुण परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री चांगलाच राडा झाला. विसर्जन मिरवणुकीत चक्क महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडल्यामुळे मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेली माहिती अशी की, मेहरूण परिसरातील महादेव मंदिराजवळ महापौर जयश्रीताई महाजन यांचे निवासस्थान आहे. याठिकाणी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास ‘एक गाव एक गणपती’ व जय श्रीराम मित्र मंडळाची मिरवणूक जात होती. यावेळी एक गाव एक गणपती मंडळाचे काही कार्यकर्ते जय श्रीराम मंडळाच्या मिरवणूक सहभागी झाले. यानंतर त्यातील काही तरुणांनी महापौर जयश्री सुनील महाजन यांच्या घरासमोर गुलालाची उधळण करून त्यांच्या घरावर गुलाल व दगडफेक करायला सुरुवात केली. यामुळे दोन गट समोरासमोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त लावला आला होता.
दरम्यान, जळगावातील कायदा व सुव्यवस्था संपली असून पोलिसांकडून परिस्थिती हाताळली जात नसेल तर अधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन घरी बसावे, अशी संतप्त प्रतिक्रिया महापौर जयश्री महाजन यांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर शहराच्या प्रथम नागरिकांच्या घरावर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय?, असा सवाल देखील महापौर जयश्री महाजन यांनी उपस्थित केला. तसेच या घटनेमागे राजकीय वाद असल्याचे वाटत नाही तसेच घरातील सदस्यातील मारहाण झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महाजन दाम्पत्याच्या भेटीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, गजानन मालपुरे, सरिता कोल्हे, मानसिंग सोनवणे आदी पोहचले होते.
घटनेनंतर संबंधित सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मूर्ती आहे त्या परिस्थितीत घटनास्थळावर सोडून पळ काढला. यावेळी कारच्या काचाही फोडण्यात आल्या असून त्यामुळे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या मदतीने पोलीस बंदोबस्तात मूर्ती विसर्जनासाठी हलवण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. तर या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसात ज्या पद्धतीने तक्रार दाखल होईल त्या तक्रारीनुसार सखोल चौकशी करण्यात येईल. या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी दिली.