जामनेर : प्रतिनिधी
गणपती विसर्जनावेळी बुडणाऱ्या लहान मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात एका तरुणाने आपला जीव गमावल्याची दु:खद घटन जामनेरमध्ये घडली आहे. किशोर राजु माळी (२७, रा.गणेशवाडी, जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास कांग नदीच्या पुलाखाली गणपतींचे विसर्जन सुरु होते. यावेळी किशोरला एक लहान मुलगा पाण्यात बुडत असताना दिसला, त्याला वाचविण्यासाठी किशोरने पाण्यात उडी मारली. त्या मुलाला त्याने वाचविले. परंतू, किशोरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कांग नदी पात्रातून त्याचा मृतदेह काढण्यात आला. किशोरचा मृतदेह उपजिल्हारुग्णालयात आणल्यावर त्याच्या पत्नी व मुलांनी एकच आक्रोश केला. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेने जामनेमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.