जळगाव : प्रतिनिधी
तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांपैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू घटना घडली आहे. निलेश राजेंद्र मिस्त्री (वय १७) आणि सूर्यवंशी शिवाजी पाटील (वय १५ , दोन्ही रा. भोलानाथ नगर, शिरसोली) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर ९ वीत शिक्षण घेणारा जय जालिंदर सोनवणे यातून बचावला आहे.
तिघे मित्र शिरसोली येथील भोलानाथ नगरातील रहिवाशी असून ते तलावात पोहण्यासाठी आज दुपारी धारागिरी शिवारात असलेल्या तलावात गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा यात बुडून मृत्यू झाला. तर तिसरा थोडक्यात बचावला आहे. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचारी आणि पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेऊन विलास भिल्ल, हिरामण प्रताप भिल्ल, संदीप भिल, या तिघांनी मृत मुलांचे मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, दोन्ही मुलांचे मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे.