निंभोरा : प्रतिनिधी
तुमचे क्रेडीट कार्ड आजच अपडेट करा, अन्यथा तुमचे कार्ड बंद होऊन जाईल, अशी थाप मारून अज्ञात भामट्याने एकाची ६४ हजार ६९३ रुपयात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात प्रवीण बाबुराव पाटील (वय ४२, धंदा – शेती रा.निंभोरा,ता. रावेर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रवीण पाटील यांचा मोबाईल त्यांच्या मुलाच्या हातात होता. त्यावेळी त्याच्या मोबाईलवर ९८८३१४९६२३ या नंबरवर फोन आला. समोरून बोलणाऱ्या भामट्याने मुलाला सांगितले की, तुमचे क्रेडीट कार्ड आजच अपडेट करा, अन्यथा तुमचे कार्ड बंद होऊन जाईल. त्यामुळे मुलाने क्रेडीट कार्डचा १६ अंकी नंबर आणि कार्डच्या पाठीमागील ३ अंकी पिन नंबर सांगितला. यानंतर लागलीच त्यांच्या खात्यातून ६४ हजार ६९३ रुपये कपात झालेत. याप्रकरणी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास निरीक्षक कैलास नागरे हे करीत आहेत.