जळगाव (प्रतिनिधी) शहरातील राज वाईनमध्ये मुदतबाह्य (Expiry Date) बिअर आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कालबाह्य बिअर जप्त केल्या आहेत.
या संदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात अशोक किराणा जवळ राज वाईन नावाचे वाईन शॉप आहे. याठिकाणी काही तरुण दुपारी बिअर पीत होते. त्यातील एका तरुणाला बिअर पिल्यानंतर उलटी झाली. त्यानंतर त्यांनी बिअरच्या बाटलीवर बघितले तर ती मुदतबाह्य झालेली होती. त्यांनी लागलीच याची तक्रार केली. त्यानंतर भरारी पथकाचे सी.एच. पाटील, आनंदा पाटील, कर्मचारी दिनेश पाटील, धनसिंग पावरा, सत्यम माळी आणि मनोज मोहिती यांच्या पथकाने दुकानाची झाडाझडती घेतली. त्यात त्यांना अमस्टल बिअरच्या १२४ बाटल्या आणि ५०० एम.एल.चे १० टीन मुदतबाह्य असल्याचे आढळून आले. भरारी पथकाने पंचनामा करत या बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारींकडे आरोपपत्र पाठवणार असल्याची माहिती भरारी पथकातील सी.एच. पाटील यांनी दिली.
बीअर हा ल्कोहोलचा हा अत्यंत सामान्य प्रकार आहे. याची एक्सपायरी डेट बॉटलवर आधीच लिहिलेली असते. त्यामुळे लोकांनाही साधारणरपणे कल्पना असते. बिअरचा कॅन असो किंवा बाटली, एकदा उघडली की एक-दोन दिवसांत ती प्यायली पाहिजे. एकदा उघडल्यानंतर, हवेतील ऑक्सिजनता बिअरशी संपर्क येतो. (ज्याला ऑक्सिडेशन म्हणतात) त्यानंतर त्याची चव खूपच खराब होते. शिवाय, बिअरची फिझ एक दिवसानंतर निघून जाते.