टोकियो (वृत्तसंस्था ) ;-ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत भारताचा अव्वल खेळाडू नीरज चोप्रा याने अंतिम शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाची कमाई केली. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताचा सुवर्णपदकाचा 12 वर्षांचा दुष्काळ समाप्त झाला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत.
नीरजने अंतिम फेरीत पहिला थ्रो 87.03 आणि दुसरा थ्रो 87.58 मीटर भालाफेक करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तीक सुवर्णपदक मिळवणारा नीरज दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी नेमबाजीत 10 मीटर एअप रायपल प्रकारात 2008 मध्ये अभिनव बिंद्रा याने सुवर्णपदक पटकावले होते. भालाफेक प्रकारात पदक जिंकणारा नीराज पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
याआधी अ गटातील पात्रता फेरीतील कामगिरीच्या निकषावर नीरजला थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे तो ऑटोमॅटिक क्वॉलिफिकेशन नियमांनुसार अंतिम फेरीत दाखल झाला होता. नीरजने पात्रता फेरीत तब्बल 86.65 मीटर अंतरावर भाला फेकला होता.दरम्यान भारताच्या खात्यात आत्तापर्यंत 7 पदके जमा झाली असून त्यात 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदकाचा समावेश आहे.