नशिराबाद : प्रतिनिधी
जळगाव खुर्द येथील तलाठी कार्यालयातील शिपायाने येथील अवघ्या ७ वर्षाच्या बालिकेच्या विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आजीने फिर्याद दिली असून त्यानुसार जळगाव खुर्द येथील तलाठी कार्यालयातील शिपायाविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास पिडीत मुलीची आजी तिच्यासोबत घेऊन तलाठी कार्यालय, जळगाव खुर्द, ता. जळगाव येथे माहीती घेणेकामी गेली होती. त्यावेळी तलाठी ऑफिस उघडे होते. ऑफिसमध्ये शिपाई भैय्या व एक इसम बसलेले होते. फिर्यादी हीने कार्यालयात बसलेल्यांना तलाठी मॅडम आहे का? याबाबत विचारपुस केली असता, शिपाई भैय्या यांने तलाठी मॅडम आताच बाहेर गेल्याचे सांगितले. फिर्यादी व तीची नात उन्हात पायी आल्याने नातीने पिण्याचे पाणी मागीतले. यानंतर फिर्यादीने नातीला तलाठी ऑफिस मध्येच बसवुन बाहेर असलेल्या नळावरुन पाणी घेण्यास गेली. फिर्यादी बाटलीमध्ये पाणी भरत असतांना नात ऑफिसमधून रडत बाहेर आली व तीने आपल्या आजीला सांगितले की, त्या काकाने माझी चड्डी ओढली. पिडीत बालिकेला घेऊन आजी तलाठी ऑफिसमध्ये जात कोणते काका होते?, याबाबत विचारपुस केली. त्यावर पिडीत बालिकेने शिपाई भैय्या याच्याकडे बोट दाखवले. यानंतर आजीने नशिराबाद पोलीस स्थानक गाठत तक्रार दिली. त्यानुसार तलाठी कार्यालयातील शिपाई भैय्या (पूर्ण नाव-गाव माहित नाही) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तपासी अंमलदार सपोनि अनिल मोरे हे करीत आहेत.