जळगाव प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी चोपडा तालुक्यातील धानोरा येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीमारच्या निषेधार्थ सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना सोमवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील धानोरा येथे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी रविवारी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी विसर्जन मिरवणुका निघाल्या. या मिरवणुकीत सहायक पोलीस निरिक्षक किरण दांडगे यांनी गावातील पाच तरूणांना किरकोळ कारणावरून गाडीत बसवून ठेवल्याने ग्रामस्थ नाराज झाले. यानंतर रात्री दहाच्या सुमारास किरण दांडगे यांनी मंडळांना वाजंत्री बंद करण्याचे निर्देश दिल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यात काही जणांनी दगडफेक सुरू केल्यानंतर पोलीसांनी गणेशमंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला होता. याघटनेच्या निषेध व्यक्त करत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले आहे.
या निवेदनावर जय गणेश मंडळ, एम.जी.रोड मित्र मंडळ, श्री वेल्लाळे देवी मित्र मंडळ, शिवाजी नगर मित्र मंडळ, गुरूदत्त उत्सव समिती खडकेचाळ, जय हनुमान उत्सव सांस्कृतीक मंडळ, अमर चौक मित्र मंडळ यांच्यासह विशाल जगदाळे, विकी भोईटे, विजय कासार, पंकज बारी, प्रशांत जुवेकर, स्वामी पेटवर, राजेंद्र गांगुर्डे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.