चोपडा : प्रतिनिधी
सेवानिवृत्त आर्मी जवान पंकज दिलीप पाटील (रा. घुमावल) यांना पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्याकडून जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंकज पाटील हे सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
2 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास शारदानगर भागात राहत असलेले सेवानिवृत्त पंकज दिलीप पाटील हे आपल्या मुलाला घेऊन बाजारासाठी गेले होते. तहसील कचेरीच्या खाली चावळी जवळ फुलहार घेत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या पंकज पाटील यांना पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी रस्त्यावर थांबून अरेरावी व दमदाटी केली. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेत पुन्हा मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांचा लहान मुलगा तहसील कार्यालय जवळ रडत होता. आणि पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण पोलीस ठाण्यात मारहाण करत होते. पंकज पाटील यांना अवतारसिंग पाटील यांनी त्यांना 8 ते 10 वेळा कानशिलात लगावली. त्यामुळे त्यांच्या कानात दुखत असल्यामुळे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.
मागील 2 दिवसापासून ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. चोपडा तालुक्यातील आजी-माजी सेवाभावी संस्थेच्या सर्व जवानांनी चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले,खासदार रक्षा खडसे, आमदार लता सोनवणे यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देऊन पोलिस अवतारसिंग चव्हाण यांच्या निलंबनाची कारवाईची मागणी केली आहे. सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने अध्यक्ष कैलास जगताप, उपाध्यक्ष गोपाल सोनवणे, सचिव संदीप बडगुजर, कोषाध्यक्ष सुभाष शिरसाट, संग्राम कोळी, वीर पत्नी कविता कदम यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.