बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यातील राजूर गावात ओळख असल्याची बतावणी करून घरात चोरी केल्याच्या प्रकरणातील फरार महिलेस बोदवड पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली.
राजूर येथील शांताराम बिजारने यांच्या घरी २९ ऑगस्ट रोजी त्यांची मुलगी घरी एकटी असतांना एका व्यक्तीने वडीलांशी ओळख असल्याची बतावणी करत व फोनवर बोलण्याचे नाटक करून गॅस हंडी मागितली. ती मुलगी हंडी घेण्यास गेली असता या इसमाच्या सोबत असलेल्या महिलेने टीव्ही जवळ ठेवलेला मोबाईल, सोन्याची मणी पोत चोरली. गॅस हंडी घेऊन गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला होता. यांनतर बिजारने यांच्या मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी गुन्हेगारांची कार्यशैली लक्षात घेत असलेल्या माहितीच्या आधारे पो.हे.कॉ.वसंत निकम ,पो.कॉ. मुकेश पाटील,भगवान पाटील, निलेश सिसोदे यांचे पथक नेमून तपास करत २४ तासाच्या आत आरोपी राजू दीपा कोळी (रा.चारठाणा, ता. मुक्ताईनगर) यास अटक केली. तसेच चोरी केलेला मुद्देमाल व गुन्हे कामी वापरलेली मोटारसायकल जप्त केली होती.
मात्र गुन्ह्यात सहभागी असलेली आरोपी महिला सापडली नव्हती. पोलिसांनी मुक्ताईनगर, मलकापूर भागात तिचा शोध घेतला. ही महिला भावासोबत बोदवडमध्ये येऊन अटकेत असलेल्या वडिलांच्या बाबत काय झाले याचा कानोसा घेण्यासाठी आली आहे. याची माहिती मिळाल्याने सोनी आकाश कोळी (वय २५) हिस अटक केली. अटक केल्यानंतर तिला न्यायालयात समोर हजर केले असता तीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या दोघांनी तालुक्यातील जलचक्र गावी सुद्धा अशीच फसवणूक करत एका महिलेच्या घरून हंडी लंपास केली असल्याची कबुली या दोघांनी दिली आहे. अश्या घटना घडू नये म्हणून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी घरातील महिला व मुलांना सूचित करून ठेवावे की, कोणीही अनोळखी व्यक्ती ओळख दाखवण्याचा प्रयत्न करून घरात येण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यात घरात प्रवेश देऊ नये. कुटुंबातील वडीलधाऱ्यांशी स्वतः संपर्क करून खात्री करावी तसेच गावात कोणीही संशयास्पद व्यक्ती किंवा लोक दिसल्यास पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी केले आहे.