जळगाव : प्रतिनिधी
हवामानावर आधारीत फळपिक विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी येणार्या विलंबाची दखल घेऊन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकार्यांसह कृषी व विमा कंपनीच्या अधिकार्यांची आढावा बैठक घेतली होती. यात शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या खात्यामध्ये हवामानावर आधारित फळपीक विम्याची तब्बल ३३४ कोटी ७० लक्ष रूपयांची रक्कम जमा होणार असल्याचे विमा कंपनीतर्फे सांगण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यातील शेतकर्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईच्या स्वरूपातील ही रक्कम जमा झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. तर, ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकर्यांना दिलेले वचन पाळल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, गत मंगळवारी हवामानावर आधारीत फळपिक विमा ज्या शेतकर्यांनी काढला आहे. याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, विमा कंपनीचे प्रतिनिधी कुंदन बारी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी खरीप पीक विमा योजनेत अनेक शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम पडण्यास अडचणी येत असल्याने, याबाबत पीक विमा कंपनीसोबत चर्चा करून शेतकर्यांच्या अडचणी सोडविण्या बाबत निर्देश गुलाबराव पाटील यांनी दिले होते. यासह हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतर्ंगत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्यांना नुकसानभरपाईपोटी ३७५ कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली असून, इतर जिल्ह्यांमधील शेतकर्यांना ती रक्कम मिळाली असली तरी जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांना अद्याप का मिळाली नाही ? याबाबत ना. गुलाबराव पाटील यांनी विचारणा केली होती. या अनुषंगाने, संबंधीत बैठकीत पीक विमा कंपनीच्या प्रतिनीधींसोबत चर्चा केल्यानंतर, ही रक्कम शुक्रवारपर्यंत शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्या संदर्भात विमा कंपनी च्या अधिकाऱ्यांना ना.गुलाबराव पाटील यांनी तंबी दिली होती.
या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील हवामानावर आधारित फळपीक विम्याच्या अंतर्गत नुकसान भरपाईच्या स्वरूपात शेतकर्यांना ३३४ कोटी ७० लक्ष रूपयांची रक्कम ही शेतकर्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. यामुळे ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकर्यांना दिलेला शब्द पाळला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांनी मंत्री गुलाबभाऊंचे आभार मानून समाधान व्यक्त करीत आहे.
भोकर वासीयांनी मानले गुलाबभाऊंचे आभार !
केळी पीक विमा प्रति हेक्टरी 70 हजार मदत मिळाल्याने शेतकरी बांधव आनंदित झाले असून आज जळगाव ग्रामीण येथील शेतकऱ्यांनी पाळधी येथील निवासस्थानी कॅबिनेटमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा सत्कार करून आभार मानले या वेळी बालाशेठ राठी, प्रमोद सोनवणे, धनराज पाटील, राजेंद्र सोनवणे, सरपंच अरुण सोनवणे, उपसरपंच रवींद्र सोनवणे, वि. का. सोसायटी चेअरमन श्रीराम सोनवणे, अशोक पाटील, लोटन दाजी, दीपक पाटील, सुभाष आप्पा, आधार बापूजी, अनिल भागवत, भीमराव सोनवणे, अनिल सोनवणे., रवींद्र बाबुराव, संजय सोनवणे, भागवत सोनवणे, दोनगावचे सरपंच भागवत पाटील, हितेंद्र आगीवाल यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, तालुकानिहाय शेतकर्यांना मिळालेली नुकसान भरपाई ही पुढीलप्रमाणे आहे. अमळनेर- ५ कोटी ९८ लक्ष; भडगाव-२ कोटी ८६ लक्ष रूपये; भुसावळ ४ कोटी ६६ लक्ष; बोदवड ४ कोटी ८७ लक्ष; चाळीसगाव १ कोटी ०२ लक्ष; चोपडा ४२ कोटी ७१ लक्ष; धरणगाव ६ कोटी ३४ लक्ष; एरंडोल ३ कोटी ७२ लक्ष; जळगाव ३४ कोटी ८२ लक्ष; जामनेर १०० कोटी ५५ लक्ष; मुक्ताईनगर ३९ कोटी ३९ लक्ष; पाचोरा २ कोटी ९८ लक्ष; पारोळा ९२ लक्ष ९६ हजार; रावेर १२० कोटी ९२ लक्ष आणि यावल ६३ कोटी १६ लक्ष रूपये.