मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून भाजप व मनसे नेत्यांच्या भेतीगाठी मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्यात मनसे व भाजप युती होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्याबाबत राज्यातील शिंदे गटाचे मुख्यमत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भाजपचे काही नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर भेटीगाठी सुरु आहेत. पण आता ५ सप्टेंबर रोजी भाजप नेते अमित शहा सुद्धा मुंबई दौऱ्यावर येत असून भाजप मनसे युतीचे नारळ ५ रोजीच फुटणार असल्याचे चिन्ह आहे. शिंदे-भाजप-मनसे या तीन पक्षांची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकी होण्याची चिन्हं आहेत.
अमित शाह ५ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने ते लालबागचा राजा आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घेतील. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या निवासस्थानीही गणपती बाप्पाचे दर्शन घेणार असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, अमित शाह यावेळी मुंबई महापालिकेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असल्याचे कळते. गेली २५ वर्ष मुंबई महापालिक असलेली शिवसेनेची सत्ता उलथवण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शाहांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने ‘मिशन मुंबई महापालिका’चा शुभारंभ होणार असल्याचे समजते.
काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरल्याची टीका शिंदे गटातील आमदार-खासदार, भाजप नेते आणि मनसेकडूनही केली जाते. अगदी राज ठाकरे आपल्या भाषणातही शिवसेनेवर हल्लाबोल चढवताना दिसतात. अनेकदा ते भाजपची बाजू घेऊन बोलताना दिसल्यामुळे मनसे भाजपशी युती करणार असल्याच्या चर्चांना पेव फुटले.
गेल्या काही दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विनोद तावडे यांची राज ठाकरेंशी भेट झाली होती. मुंबई महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आहेत. त्याचप्रमाणे औरंगाबाद, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक अशा महापालिकांच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे ठाकरेंना शह देण्यासाठी तिघे जण एकत्र येण्याची शक्यता आहे. शिवसेनेची मतपेटी फोडण्यासाठी भाजप मनसेला जवळ खेचत असल्याच्या चर्चा नवीन नाहीत. कालच्या शिंदे-राज ठाकरे भेटींनी तीन पक्षांच्या महायुतीच्या चर्चांनाही जोर आला आहे.