चोपडा : प्रतिनिधी
शहरातील त्र्यंबकनगरातील रहिवासी विद्या प्रल्हाद पाटील (वय ४५, मूळ रा. पिंपळेसिम, ता. धरणगाव) या महिलेने गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गावाजवळील निमगव्हाण नदीच्या पुलावरून उडी विद्या पाटील मारून आत्महत्या केली. तालुक्यातील वर्डी माध्यमिक शाळेचे क्रीडा शिक्षक प्रल्हाद गोपीचंद पाटील यांच्या त्या पत्नी होत.
तांदलवाडी व निमगव्हाणदरम्यान तापी नदीपात्रात शिवरस्त्याजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. तांदलवाडी गावातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला.
तापी नदी सध्या दुथडी भरून वाहत असल्याने पुलापासून एक किमी अंतरावर मृतदेह आढळला. मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणला गेला. आज शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मृत विद्या पाटील यांना जवळच्या ओळखीच्या एका व्यक्तीने पायी जाताना यावल रस्त्यावरील हॉटेल योगी समोर साडेपाच वाजेच्या सुमारास पाहिले होते. मात्र, त्या नियमित पायी फिरत असत, त्यामुळे त्या व्यक्तीने त्यांची चौकशी केली नाही. त्यानंतर त्यांनी बसने निमगव्हाण गाठून पुलावरून उडी मारली असावी, असा अंदाज आहे. बुधवारी विद्या पाटील यांनी आपल्या गल्लीतील एकदंत गणेश मंडळात मनोभावे आरती केली होती. तसेच दुपारी गणपती स्थापनेनंतर गल्लीतील सर्व महिलांसोबत ग्रुप फोटोदेखील काढला होता. त्यानंतर अचानक त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने तापी सर्वांना धक्का बसला आहे. दरम्यान, पोलिस कॉन्स्टेबल किरण पाटील यांना घटनेची माहिती वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याने चेकपोस्ट नाक्यावरून कळवली होती. त्यामुळे पाटील यांनी तत्काळ काही पोहणाऱ्यांना फोन करून सांगितले. त्यानुसार तीन ते चार जणांनी तापी नदीत उडी मारून महिलेला वाचण्यासाठी प्रयत्न केले परंतु ते अयशस्वी ठरले.