मुंबई : वृत्तसंस्था
अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं आवाहन केलं आहे. परंतू राष्ट्रवादीमध्ये यायचं की नाही? हा निर्णय सर्वस्वी पंकजा मुंडे यांचा आहे, असं एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का? याबाबत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे स्पष्ट विधान केलं आहे. याबाबत विचारलं असता खडसे म्हणाले, पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी काम केलं आहे. असं असताना पंकजा मुंडे यांच्यावर भाजपामध्ये अन्याय होत आहे, अशी भावना सातत्याने जनतेमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत, अशा प्रकारच्या बातम्याही येतात. त्यामुळे स्वाभाविकपणे अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलं. राष्ट्रवादीत यायचं की नाही? हा निर्णय पंकजा मुंडे यांनी घ्यायचा आहे. पण त्यांनी वर्षानुवर्षे भाजपाचं काम केलं आहे. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार करतील, असं मला वाटतं नाही” असं स्पष्ट विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांना मंत्रिपदासाठी वाट पाहत न बसता थेट वरिष्ठ नेतृत्त्वाकडे जाऊन दाद मागण्याचा सल्ला खडसे यांनी दिला होता.