नागपूर : वृत्तसंस्था
राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान न मिळाल्यावर केंद्रीय मंत्री गडकरींनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ते भाजपा सोडून काँग्रेस किंवा अन्य पक्षात जाणार नाहीत, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत बोलत असतांना त्यांनी विहिरीत उडी मारीन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, असे म्हटले आहे.
गडकरींनी सांगितलं की, जेव्हा ते विद्यार्थी नेता म्हणून काम करत होते. तेव्हा काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी गडकरींना काँग्रेसमध्ये यायची ऑफर दिली होती. त्याबद्दल सांगताना गडकरी म्हणाले की, मी श्रीकांतला सांगितलं की मी विहिरीत उडी मारून जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. कारण मला काँग्रेसची विचारधारा आवडत नाही.
नितीन गडकरी यांनी हा किस्सा सांगून सध्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. भाजपच्या संसदीय मंडळातून काढून टाकल्यानंतर तसंच इतरही काही कारणांमुळे नितीन गडकरी नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. आपल्या एका भाषणात गडकरींनी सध्याच्या राजकारणाबाबत बोलताना आजकाल राजकारण समाजकल्याणासाठी राहिलं नसून सत्तेसाठी असल्याचंही म्हटलं होतं. यानंतर नितीन गडकरी पक्षातून बाहेर पडणार का? अशी चर्चा होती. मात्र, एकप्रकारे गडकरींनी पुन्हा एकदा हा किस्सा सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.