जळगाव : प्रतिनिधी
हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेच्या (आंबिया बहार) नुकसान भरपाईची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची सूचना विमा कंपनीला द्या, असे आदेश ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले. यामुळे जिल्ह्यातील विमाधारक ५० हजार शेतकऱ्यांना ३७० कोटी रुपये मिळतील.
हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२१-२२ अंतर्गत केळी विमाधारक शेतकऱ्यांना कमी व जास्त तापमान, वादळी वारा व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मंजूर झाली आहे. अशा शेतकऱ्यांची संख्या ५० हजारापर्यंत आहे. त्यांना सुमारे ३७० कोटींची नुकसान भरपाई मंजूर आहे. मात्र, ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना पीक विमा समितीचे अध्यक्ष या नात्याने विमा कंपनीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर भरपाईची रक्कम जमा करण्याची सूचना देण्याचे आदेश दिले.