यावल : प्रतिनिधी
शहरातील काजीपुरा वस्तीतील ३८ वर्षीय महिलेच्या खूनप्रकरणी अटकेतील आरोपीला १ सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. अनैतिक संबंधातून वाढलेल्या वादात सदर महिलेकडून तिघांच्या मदतीने मे महिन्यात या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यात तरूण बचावला होता. त्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात तडजोडीसाठी वाढत्या दबावाच्या तणावातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
शहरातील काजीपुरा वस्तीतील नाजिया खलील काजी (वय ३८) या महिलेची संशयित जावेद युनूस पटेल (वय २३) याने डोक्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. यानंतर तो स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला होता. या संशयिताला रविवारी सकाळी यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधीश एम.एस.बनचरे यांच्यासमोर हजर केले. तेथे त्याला १ सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, एपीआय विनोद गोसावी, सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण, हवालदार जगन्नाथ पाटील करत आहे. यावल पोलिस या घटनेचा आणखी बारकाईने तपास करत आहेत. आणखी कुणाचा या गुन्ह्यात सहभाग आहे, संशयिताने कुणाची मदत घेतली, याचाही शोध घेतला जात आहे.
जावेदने काढला मागील भांडणाचा वचपा
मृत महिलेने ५ मे २०२२ च्या रात्री २ वाजता जावेद पटेल याला कॉल करून घराबाहेर बोलवले. यानंतर शेख मुजम्मील उर्फ मुज्जू शेख हकीम (वय २६), हिदायतअली उर्फ राजू शेखावत अली (वय २०) व शेख शोएब शेख इक्बाल खाटीक (वय २९, तिघे रा.तहानगर फैजपूर) या तिघांनी त्यास दुचाकीवर बसवून भुसावळ रस्त्यावरील घोडेपीर बाबा दर्गाजवळ गेले. तिथे तिघांनी जावेदवर चाकूने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्या घटनेत बचावल्यानंतर जावेदने हा वचपा काढला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.