जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची प्रचंड गर्दी
जळगाव प्रतिनिधी । रेस लावलेल्या भरधाव कारने सायकलवर जाणाऱ्या ११ वर्षीय मुलाला उडविल्याची धक्कादायक घटना दुपारी साडेतीन वाजता मेहरूण ट्रॅकजवळ घडली आहे. या अपघातातील तीन जणांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विक्रांत मिश्रा हा आई व वडील यांच्यासह एकनाथ नगर येथे रहायला होता. विक्रांत हा मेहरून तलावाजवळील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकत होता. आज रविवार 28 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजता वाजेच्या सुमारास त्याचा काकाचा मुलगा सुनील जितेंद्र मिश्रा यांच्यासोबत मेहरून ट्रॅकवर सायकलवर फिरण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याचवेळी मेहरून ट्रॅकवर दोन कार यांची रेस लावण्यात होती. यामधील एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने सायकलवरील विक्रांतला सायकलीसहीत उडविले. हा अपघात एवढा भीषण होता की, विक्रांत हा चेंडूसारखा वर उडून खाली पडला होता. तर त्याची सायकल झाडाला अडकली होती. या घटनेमुळे परिसरात सुन्न वातावरण झाले होते.
जखमीवस्थेत विक्रांतला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. या गुन्ह्यातील कार आणि तीन जणांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यााचे काम सुरू होते.