बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यातील लोणवाडी येथे बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पोळ्याच्या दिवशीच तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विनोद वसंत चौधरी (वय ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
पिंपळगाव देवी रस्त्याजवळील बोरलोन या ठिकाणी असलेल्या तलावात, ते बैल धुण्यासाठी गेले होते. बैलांना अंघोळ घालत असताना अचानक बैल बिथरले. तसेच बैल तलावातील खोल पाण्यात शिरले. यावेळी शेतकरी विनोद चौधरी यांनी बैलांचा दोर धरून ठेवलेला होता. त्यामुळे ते देखील बैलांसोबत पाण्यात ओढले गेले. तलावातील गाळामधे फसत असल्याचे लक्षात, आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी विनोद चौधरी यांना तलावाबाहेर काढले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे लोणवाडी गावावर पोळ्याच्या दिवशी शोककळा पसरली. चौधरी यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, श्री.चौधरी यांच्या मृत्यूनंतर लोणवाडीत पोळा साजरा झाला नाही. गावामध्ये बैलांची मिरवणूक काढण्यात आली नाही. चौधरी हे दुसऱ्यांची शेती नफ्याने करत होते. त्यांची मुलगी दहावीत शिक्षण घेत असून मुलगा तिसरीत आहे. विनोद चौधरी हे घरातील एकमेव कमावते होते.