पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झालेला राडा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. विधानभवनात अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यात झालेल्या बाचाबाचीवरून बच्चू कडूंनी खोचक शब्दांत विरोधकांवर टीका केली आहे. बच्चू कडू यांनी विरोधकांवर निशाणा ५० खोके’ घोषणेवरून विरोधकांना थेट चॅलेंज दिले.
अमोल मिटकरींना लक्ष्य करत बच्चू कडू म्हणाले, “मला तर वाटतं की काही लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत आणि पायरीवर येऊन जोरजोरात बोंबलतात. पायऱ्यांवर कुणी बोललं आणि बॅनर छापले की त्याची ब्रेकिंग होते”. “५० खोके, एकदम ओके वगैरे घोषणा त्यांनी केली. तुम्हाला जर ५० खोके दिले असं वाटत असेल, तर कारवाई करा. असं नामर्दांसारखं वक्तव्य का करत आहात? मर्दानगी असेल, तर समोर या आणि पुरावे द्या”, असे आव्हान बच्चू कडूंनी विरोधकांना दिले आहे.
दोन्ही गटांमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर बाचाबाची झाली, तेव्हा नेमकं काय घडलं, यावर बच्चू कडूंनी भूमिका मांडली आहे. “आधी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांनी घोषणाबाजी सुरू असताना राष्ट्रवादीचे आमदार तिथे अचानक आले. वास्तविक त्या पायऱ्यांवर कुणी आधीपासून नारेबाजी करत असेल, तर दुसऱ्याने जाऊ नये असा प्रघात आहे. पण असं असताना जाणीवपूर्वक राष्ट्रवादीचे आमदार मागे उभे न राहाता गोल उभे राहिले. म्हणजे आधी त्यांनी चूक केली. उलट म्हणायला लागले की सत्ताधाऱ्यांना माज आला”, असे बच्चू कडूनी व्यक्त केले.