नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे आझाद यांनी राजीनामा दिल्याबरोबर पक्षाचे सदस्यत्वही सोडलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून गुलाम नबी आझाद अस्वस्थ होते. ही अस्वस्थता पक्षाच्या बैठकीतून, त्यांच्या विधानांवरुन आणि कृतीतूनही दिसून येत होती. ते कधीही मोठा निर्णय़ घेतील, अशी चर्चा सुरू होतीच. या आधीच १६ ऑगस्ट रोजी त्यांनी जम्मू काश्मीरच्या प्रचार प्रमुख पदाचा राजीनामाही दिला होता. नियुक्तीच्या अवघ्या काही तासांमध्येच त्यांनी हा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची नाराजी उघडकीस आली होती.
गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण पक्षातील महत्त्वाच्या नियुक्त्या करताना त्यांचा सल्ला घेण्यात येत असे. तसंच ते पक्षात सक्रिय होते. काही दिवसांपूर्वी नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी केलेल्या आंदोलनात आझाद सहभाही होते. शिवाय त्यांनी पत्रकार परिषदेलाही संबोधिक केलं होतं.
आझाद यांनी वारंवार काँग्रेसच्या कार्यपद्धतीबद्दल आपला आक्षेप नोंदवला होता. सोनिया गांधींना त्यांनी याबद्दल पत्रही लिहिलं होतं. जी-२३ नेत्यांचं नेतृत्वही त्यांनी केलं होतं. शिवाय या गटावर काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेमुळेही ते अस्वस्थ होते. आनंद शर्मा यांनीही दोन दिवसांपूर्वी आपल्यावरच्या जबाबदाऱ्यांचा त्याग केला होता.
गुलाम नबी आझाद पक्षाच्या बंडखोर जी-23 समुहाचे सक्रिय सदस्य होते. या गटाने पक्षात दिल्लीपासून गल्लीपर्यंत अमुलाग्र सुधारणांची मागणी केली होती. या गटाच्या कारवायांमुळे आझाद यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. विशेषतः केंद्राने यंदाच त्यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान केल्यामुळे त्यांची केंद्रातील सत्ताधारी भाजपशी जवळीक वाढल्याची चर्चा होती. या सर्वांची परिणिती आझाद यांच्या आजच्या राजीनाम्यात झाली आहे.