एरंडोल : प्रतिनिधी
धुतलेले कपडे वाळवण्यासाठी घराच्या गच्चीवर टाकणाऱ्या महिलेला वीज वितरण कंपनीच्या तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना २५ ऑगस्टला सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास भवानीनगर परिसरात घडली.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील भवानी नगरमध्ये रामदास काशिनाथ भोई, मीराबाई रामदास भोई, सुरेश रामदास भोई हे मुलांसह राहतात. सकाळी पती रामदास भोई, मुलगा सुरेश भोई व सून हे सर्व कामावर निघून गेले. तर मीराबाई या देखील बोंबील, झिंगे विक्रीचे काम करतात. घरातील सर्वजण कामावर निघून गेल्यामुळे आंघोळ करून मीराबाई या धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी गच्चीवर गेल्या. त्यांच्या गच्चीवरून वीज वितरण कंपनीचे तार गेलेले आहेत. या तारांना स्पर्श झाल्याने मीराबाई भोई (वय ७०) या गच्चीवर पडल्या. परिसरातील नागरिकांनी आरोडारोड केल्यामुळे शेजारी राहणारे अरुण सुखदेव भोई यांच्यासह इतरांनी गच्चीवर धाव घेतली. संजय भोई, दिलीप भोई व इतरांच्या मदतीने मीराबाई यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात हलवले. वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील यांनी मीराबाईंना मृत घोषित केले. याबाबत एरंडोल पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद केली अाहे. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात अाले.