अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार विरोधकांना टोले लगावले. शिंदे यांनी विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले, टीकेलाही प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवरही शिंदे यांनी जोरदार उत्तर देत टोला लगावला
जयंत पाटील यांनी बुधवारी सभागृहात चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंबधी केलेल्या विधानाचा संदर्भ देत शिंदेंना डिवचले आहे. मनावर दगड ठेवून शिंदे यांना मुख्यमंत्री केले त्यावर जयंत पाटील म्हणाले होते, भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री केले असेल तर कुठलीही भानगड न ठेवता आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी देऊ. तुमच्यातील गुण पाहता तसे करण्यास कोणीही नकार देणार नाही, असे मिश्किल भाष्य जयंत पाटील यांनी केले होते.
गुरुवारी सभागृहात बोलताना शिंदे यांनी जयंत पाटील यांच्या ऑफरवर उत्तर देताना, तुम्ही दादांना विचारले का? असा जोरदार टोला लगावला. तुम्ही अजित दादांना विचारले का? विरोधी पक्षनेता तुम्हाला व्हायचे होते, ते तरी तुम्ही झाले का, असा सवाल शिंदे यांनी केला. कालच्या भाषणातून ते दिसत होते, असे शिंदे म्हणाले. दादांची दादागिरी नेहमी चालणार असेही शिंदे म्हणाले. हलके फुलके वातावरण करताना तुम्ही बोचेल असे बोलत होतात, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.