नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी 11 वाजता आपल्या निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. मात्र, आपचे काही आमदार नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू झाल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
आम आदमी पक्षाला भाजप आपले आमदार फोडेल की काय अशी शंका होती. त्यामुळे काल संध्याकाळी आम आदमी पक्षाच्या राजकीय घडामोडी समितीच्या बैठकीत सर्व आमदारांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतू या बैठकीच्या आधीच आपचे काही आमदार नॉटरिचेबल झाले आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचे एकूण 62 आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार होती. दरम्यान, भाजपने आमच्या आमदारांना धमकावलं आणि आमची २० कोटी रुपयांची ऑफर स्वीकारा नाहीतर सिसोदिया यांच्यासारख्या सीबीआय खटल्यांना सामोरे जा, असं संजय सिंह यांनी बुधवारी म्हटलं होतं. तर भाजपने 20-25 आमदारांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यात आता केजरीवालांनी बोलवलेल्या बैठकीपूर्वी आपच्या काही आमदारांशी संपर्क होत नसल्यामुळे ‘आप’च्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.