पाचोरा : प्रतिनिधी
नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची ५ लाखांत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालूक्यातील आखतवाडे येथील गणेश मोतीलाल गढरी (वय – ३२) यांना शिपाई पदावर नोकरी लावुन देतो असे सांगत गणेश गढरी यांचे चुलत मामा जगन गंगाराम पवार (रा. मोहलाई ता. सोयगाव जि. औरंगाबाद) यांचे परिचयातील सागर रतन बागुल (रा. एकलहरे, मेन गेट सामनगांव रोड, ता. जि. नाशिक) व एस. पी. बोडखे (रा. डोंबिवली ता. कल्याण जि. ठाणे) यांच्याशी ओळख करुन दिली होती. त्यानंतर दि. १९ मार्च २०२१ ते दि. १९ जानेवारी २०२२ या कालावधीत गणेश गढरी यांच्याकडून नोकरी लावून देण्याच्या नावाखाली सागर बागुल यांनी त्यांच्या ‘फोन पे’ वर वारंवार पैशांची मागणी करत ५ लाख २५ हजार रुपये उकळले. पैसे दिल्यानंतर गणेश गढरी यांनी सागर बागुल व एस. पी. बोडखे यांना फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सागर बागुल यांचा मोबाईल बंद तर एस. पी. बोडखे हे ठराविक कालावधीनंतर मागुन पैसे देतो असे सांगत वेळ मारुन नेत होते. दरम्यान गणेश गढरी यांनी दि. २२ आॅगस्ट २०२२ रोजी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत सागर बागुल व एस. पी. बोडखे यांचे विरुध्द फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे . या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.