धरणगाव : प्रतिनिधी
येथील धरणी चौकातील एका सोनाराला बनावट सोनं गहाण ठेवण्याच्या नावाखाली चक्क सहा लाखात गंडवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील धरणी भागात कौस्तुभ सराफ (रा. पंचमुखी हनुमान मंदिर जळगाव) यांचे रुद्र ज्वेलर्स नावाने दुकान आहे. श्री.सराफ यांच्याकडे धर्मेंद्र यादव आणि एक अनोळखी व्यक्ती मागील काही दिवसांपूर्वी एक दोन वेळेस सोने तारण ठेवून पैसे घेऊन गेले होते. व्यवहार बरा असल्यामुळे श्री.सराफ यांनी धर्मेंद्र यादवकडून १९ ऑगस्ट रोजी १८ तोळे सोने तपासून ६ लाख ९ हजार ५०० रुपयांमध्ये तारण ठेवले. परंतु श्री. सराफ यांनी जळगाव येथे गेल्यावर सोन्याचे दागिने तपासून बघितले असता, त्यावर फक्त काही अंशी सोन्याचा मूलमा असून दागिने सोन्याचे नव्हे तर, चांदीचे असल्याचे लक्षात आल्यानंतर श्री.सराफ यांना आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी वस्तू सराफ यांच्या फिर्यादीवरून धर्मेंद्र यादव व एक अनोळखी इसम अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार योगेश जोशी हे करीत आहेत. दरम्यान, अज्ञात भामट्यांनी चक्क सोनाराला गंडविल्यामुळे ते सराईत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.