नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापा टाकल्याची बातमी समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. याची माहिती खुद्द सिसोदिया यांनीच ट्वीट करत दिली आहे. यामध्ये त्यांनी सीबीआय आली असून, त्यांचे स्वागत आहे. आम्ही अत्यंत प्रामाणिक असून, लाखो मुलांचे भविष्य घडवत आहे. मात्र,आपल्या देशात चांगले काम करणाऱ्यांना अशा प्रकारे त्रास दिला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच आपला देश अजून नंबर-१ बनलेला नसल्याची टीका केली आहे. सत्यंद्र सिंह यांच्यापाठोपाठ दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरात आज सीबीआय पोहोचली आहे. हे प्रकरण दिल्लीतील एक्साईज पॉलिसी संदर्भातील आहे. दिल्लीमध्ये एक्साइज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने 20 ठिकाणांवर छापे टाकले आहे. याच साखळीत सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या घरी देखील छापा टाकला आहे.
सीबीआयच्या या कारवाईनंतर सिसोदिया यांनी तीन ट्वीट केले आहेत. यामध्ये ते म्हणतात की, काही लोक दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामावर नाराज आहेत. त्यामुळे दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. जेणेकरून शिक्षण आरोग्याची चांगली कामे थांबवता येतील. सिसोदिया म्हणाले की, आमच्या दोघांवर खोटे आरोप आहेत. न्यायालयात सत्य बाहेर येईल.
दुसऱ्या ट्वीटमध्ये सिसोदिया यांनी लिहिलं आहे की, “आम्ही सीबीआयचे स्वागत करतो. तपासात पूर्ण सहकार्य करु जेणेकरुन सत्य लवकर समोर येईल. आतापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र काहीही निष्पन्न झालेलं नाही. त्यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझं काम थांबवता येणार नाही.”