जळगाव (प्रतिनिधी ) ;- शहरातील शिवाजी नगर भागात असणाऱ्या जुन्या कानळदा जकात नाका तोडण्यासाठी मनपाचे जेसीबी आणि ट्रॅक्टर घेऊन गेलेल्या नगरसेवकाला अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत शहर पोलीस स्टेशनला नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी तक्रार केली आहे. शिवाजी नगरातील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी जुन्या कानळदा जकात नाक्यावर अवैध दारू विक्री तसेच महिलांची छेडखानी होत असल्याचे प्रकार घडत असल्याने हा जकात नाका तोडण्यात यावा अशी मनपाकडे वेळोवेळी तक्रार आणि मागणी केली होती. त्यामुळे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी आज मनपाचे बुलडोझर घेऊन कानळदा जकात नाका पाडण्यासाठी आले असता त्यांना भोई नामक व्यक्तीने दमदाटी करून नाका कशाला पाडता अशी विचारणा करून महेश पवार यांच्यासह अन्य ४ जणांनी नवनाथ दारकुंडे यांना मारहाण केली . हि घटना दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली . याबाबत नवनाथ दारकुंडे यांनी शहर पोलीस स्टेशन गाठत मारहाण करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली आहे. याबाबत पोलीस तपास करीत आहे.