हरिहरेश्वर : वृत्तसंस्था
देशात १५ ऑगस्टच्या दिवशी दिल्ली उडवायची धमकी दिल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आज रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि भरडखोल या पर्यटनस्थळी समुद्रात दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या आहेत. या बोटींमध्ये एके ४७ रायफल सापडल्यानं खळबळ उडाली आहे.
प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीनं ही बोट किनाऱ्यावर आणण्यात आली. पण ही बोट नेमकी कोणाची आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. यांपैकी एका बोटीमध्ये तीन एके-४७ रायफल्स सापडल्या आहेत. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पण हे लोक नेमके कोण आहेत हे समजू शकलेलं नाही.
खासदार सुनील तटकरे म्हणाले, हरिहरेश्वरच्या परिसरात घातक शस्त्रे असल्याची बोट सापडली आहे. काही लाईफ जॅकेट्सही या परिसरात सापडले आहेत. माझी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती आहे की, या घटनेचा तातडीनं सर्व यंत्रणांच्या मार्फत तपास व्हायला हवा. त्याचबरोबर अशाच पद्धतीची घातक शस्त्रे आपल्या किनारपट्टीवर येऊ नयेत यासाठी खबरदारीच्या उपाययोजना यापूर्वी केल्या होत्या, काही यंत्रणा उभी केली होती. त्यांचं यामध्ये अपयश आहे का? याची चौकशी करण्यात यावी. कारण या बोटी भरकटून किनारपट्टीवर आली की काय हे देखील तपासातून पुढे येईल.
रायगडच्या जनतेनं विचलीत होऊ नये, अशी विनंती त्यांना करतो. चोवीस तासात याबाबतीतलं सत्य जनतेसमोर येणं आवश्यक आहे. राज्य सरकारच्या दहशतवादविरोधी पथकानं या घटनेची सूत्र तातडीनं हातात घेणं गरजेचं आहे. कारण ही सर्व रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी सगळे सुरक्षेच्या यंत्रणांनी हा तपास करणं गरजेचं आहे, असंही पुढे सुनील तटकरे म्हणाले. दरम्यान, यापार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून हायअलर्ट जारी झाला आहे.