मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर पहिल्याच पावसाळी अधिवेशनामध्ये आज शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने आला. शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे सभापती नीलम गोऱ्हे यांनी ‘तुम्ही मंत्री असाल तर घरी’ असं म्हणत त्यांना चांगलेच सुनावले.
शिक्षकांच्या बाबतीतील एका प्रश्नावरुन गदारोळ सुरू असताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गदारोळादरम्यान मंत्री गुलाबराव यांना वारंवार खाली बसण्याची विनंती करत होत्या. “गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली, आधी खाली बसा ताबडतोब. सभागृहात वागायची ही कुठली पद्धत आहे. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही का? परत परत सभापतींना सांगावं लागतंय. चौकात आहात का तुम्ही?”, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या. यावर गुलाबराव पाटील यांनी “मी मंत्री आहे”, असं म्हटलं. यावरुन निलम गोऱ्हे आणखी संतापल्या आणि “मंत्री काय? मंत्री तुम्ही घरी, आधी खाली बसा. हे सभागृह आहे हे लक्षात घ्या. शांत राहा”, असं सुनावलं.
विधान परिषदेचं कामकाज सुरू झालं आहे. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमकपणे मुद्दा मांडला. “जर दादागिरी केली जाईल तशी भाषा असेल तर आम्हाला ही उत्तर देता येईल” असं पाटील म्हणाले होते, त्यांच्या या विधानावर दानवे यांनी आक्षेप घेतला आणि पाटील यांनी माफी मागण्याची मागणी केली.
गुलाबराव पाटील यांच्या विभागाचा प्रश्न सुद्धा नव्हता, पण त्यांना बोलण्याचं काय कारण आहे? असा सवाल दानवेंनी केला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी केली आणि शब्दांने शब्दाने वाढू नये, अशी विनंती केली. पण विरोधी पक्षातील आमदारांनी लॅाबीमध्ये येऊन घोषणाबाजी केली. सभापती गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांना ताकीद दिली.