मुंबई : वृत्तसंस्था
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि मराठा समाजाचे नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना राज्यापाल कोट्यातून विधानपरिषदेवर घ्यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे.
विनायक मेटे यांच्या कारला पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर नुकताच भीषण अपघात झाला. यामध्ये मेटे यांचं निधन झालं. तीन दिवसांपूर्वी रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. पतीच्या अपघाती निधनावर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी संशय व्यक्त केला असून मेटेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षासाठी मोठा लढा उभा केला होता. मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला विधानपरिषदेवर संधी मिळावी, असं अंकुश काकडे यांनी म्हटलं आहे. शिवसंग्राम संघटना भाजपसोबत युतीत आहे. त्यामुळं राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत ज्योती मेटे यांचा समावेश असावा असं काकडे यांनी सूचित केलं आहे.