गोंदिया : वृत्तसंस्था
गोंदिया येथे मंगळवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरले. या अपघातात ५० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेन यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला. कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. ही ट्रेन छत्तीसगडमधील बिलासपूरहून राजस्थानमधील जोधपूरला जात होती.
गाढ झोपेत होते प्रवासी
अपघात झाला तेव्हा ट्रेनमधील बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. धडक होताच एकच खळबळ उडाली आणि प्रवासी ट्रेनमधून उतरले. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, भगत की कोठी स्थानकावरून सिग्नल न मिळाल्याने अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
तीन तासांनंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू
अपघातानंतर पहाटे 4.30 वाजता री-रेलमेंटचे काम पूर्ण झाल्याचे भारतीय रेल्वेने सांगितले. अपघातग्रस्त पॅसेंजर ट्रेन पहाटे 5.24 वाजता सुटली आणि 5.44 वाजता गोंदियाला पोहोचली. पहाटे 5.45 वाजता वाहतूक पूर्ववत झाली.