मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे वरिष्ठ आमदार आणि विधीमंडळाचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांना पत्र पाठवल्याने एकच खळबळ उडालेली आहे.प्रथमच शिवसेना नेत्यांशी संपर्क साधला आहे, तोही पत्राद्वारे. अनेक प्रश्न निर्माण झाले असून नक्की काय होणार र याकडे लक्ष लागले आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानाचे निमंत्रण या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिले आहे. शिवसेनेत उभी फूट पाडली असताना हे दोन्ही गट गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर अक्षरशः तुटून पडत आहेत. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. मात्र, अचानक मुख्यमंत्री म्हणून बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्राद्वारे शिवसेना नेत्याशी संवाद साधला आहे. शिवसेनेचे पक्षप्रतोद प्रभू यांना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथिगृहावर आयोजित चहापानाचे निमंत्रण दिले आहे.
पत्रात मुख्यमंत्री म्हटले आहे की, महाराष्ट्र विधान मंडळाचे सन २०२२ चे (पावसाळी) अधिवेशन बुधवारपासून (ता. १७ ऑगस्ट) मुंबई येथे सुरू होत आहे. महाराष्ट्र विधानमंडळास एक गौरवशाली परंपरा लाभली आहे. या परंपरेनुसार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या निमित्ताने महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याबरोबर अनौपचारिक, मनमोकळी आणि सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा व्हावी, या हेतूने आपणांस अगत्यपूर्वक या कार्यक्रमासाठी निमंत्रित करत आहे.