बीड : वृत्तसंस्था
शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचं १४ रोजी पहाटे अपघाती निधन झालं. हा अपघात घडल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर खुद्द विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अपघाताच्या त्या दोन तासात काय झालं? याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली होती. अशातच आता सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज विनायक मेटेंच्या अपघातापूर्वी त्यांच्यासोबत असलेले आणि त्यांचे निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर यांचा असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओ क्लिपमधून तीन ऑगस्टला सुद्धा मेटे यांच्या गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणानंतर ज्योती मेटे यांनी स्वतः मायकर यांच्याशी संवाद साधला आहे.
त्या म्हणाल्या की, “व्हायरल होत असलेली क्लिप मी आत्ताच ऐकलेली आहे. अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझं देखील बोलणं झालं आहे. त्यांचं म्हणणं होतं की, समोरच्या गाडीवर आपली गाडी नेऊन आदळावी, अशा पद्धतीनं ती गाडी ओव्हरटेक करत होती. ही बाब निश्चितच आक्षेपार्ह्य होती. त्यामुळे या एकूण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. तीन ऑगस्टला असाच प्रकार घडल्याचं देखील अण्णासाहेब यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे.”
तपास कसा सुरुये याबाबत मला माहीत नाही : ज्योती मेटे
“या संपूर्ण प्रकरणाचा तपास कोण करतंय? किंवा तपास कसा सुरु आहे, याबाबत मला काहीच सांगता येणार नाही. मला याबाबत काहीच माहिती नाही.”, असं ज्योती मेटे म्हणाल्या. “सर्व तपास यंत्रणांकडे माझी आणि शिवसंग्राम कुटुंबियांची हीच मागणी असेल की, निपक्षपातीपणे ही चौकशी झाली पाहिजे आणि जे काही सत्य असेल, ते तातडीनं सर्वांसमोर आलं पाहिजे.” , असंही त्या म्हणाल्या.
“मला देखील यामध्ये संशय वाटतो आहे. अपघातातील गाडी आणि तीन तारखेची गाडी यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि संपूर्ण प्रकाराची चौकशी करून न्याय मिळाला पाहिजे.”, अशी मागणी पुन्हा एकदा विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे.