नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शिवसेनेच्या धनुष्यबाण या पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोग सुनावणी घेण्याची भीती उद्धव ठाकरेंना असल्यानं त्यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या सुनावणीवर आज कोर्टात सुनावणी पार पडली. शिवसेनेच्या या भीतीवर सुप्रीम कोर्ट निरिक्षण नोंदवणार आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे गटासाठी हा दिलासा मानला जात आहे.
सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे गटाच्या भीतीवर निरिक्षण नोंदवणार असलं तरी यापूर्वीच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगानं यासंदर्भत कोणताही निर्णय घेऊ नये, असं म्हटलं होतं. त्यामुळं निवडणूक आयोगाकडून असा प्रकारचा निर्णय घेतला जाणार नाही, असं ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांनी म्हटलं आहे. त्यामुळं शिवसेनेला वाटत असलेली भीती ही अनाठायी असल्याचं त्यांचं मत आहे.
दरम्यान, शिवसेनाच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांकडून विविध याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहेत. या याचिकांवर पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. पण तत्पूर्वी १९ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोग शिवसेनेचं पक्ष चिन्ह धनुष्यबाणाबाबत निर्णय देऊ शकते, अशी भीती उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत व्यक्त केली आहे.